पनवेल / मोहपाडा (विशेष प्रतिनिधी - संजय गायकवाड):
पनवेल तालुक्यातील मोहपाडा-रसायनी परिसरातील चांवडोली येथील रवींद्र महादेव चितळे या व्यक्तीने भररस्त्यात पत्रकारांना तसेच 'वंचित बहुजन आघाडी'च्या पदाधिकाऱ्यांना व पक्षाला अत्यंत हीन दर्जाची शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची ऑडिओ/व्हिडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी पत्रकार व विविध संघटनांकडून जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र चितळे याने भररस्त्यात थांबून पत्रकारांना व वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना उद्देशून अपशब्द वापरले. या संपूर्ण प्रकाराचे एका नागरिकाने चित्रीकरण करून ही रेकॉर्डिंग स्थानिक पत्रकारांकडे पाठवली. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोहपाडा पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर अर्ज सादर केला आहे. तसेच पेन येथील पत्रकार संजय गायकवाड यांनीही पोलीस ठाण्यात उपस्थित राहून या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त करत पोलीस तक्रार दिली आहे.
वनविभागाची जागा बळकावल्याचा व अवैध धंद्यांचा आरोप
स्थानिकांनी व पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र चितळे याने वनविभागाची मोठ्या प्रमाणावर जागा बेकायदेशीरपणे लाटण्याचा प्रयत्न केला असून, या भागात त्याचे अनेक अनाधिकृत व्यवसाय सातत्याने सुरू आहेत. तसेच स्वतःच्या समाजातील लोकांनाही त्याने विविध प्रकारे त्रास दिल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
पोलीस ठाण्यावर धडक आंदोलनाचा इशारा
या मोकाट फिरणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करून त्याच्यावर मानहानीचा व इतर कलमांन्वये तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणी त्वरित पावले उचलून त्याला अटक न केल्यास सर्व पत्रकार संघ, पत्रकार, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व बाधित नागरिक एकत्र येऊन मोहपाडा रसायनी पोलीस ठाण्यावर मोठे आंदोलन छेडतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या