*उपसंपादक योगेश पाटील निकम-*
श्री क्षेत्र नाथ आश्रम, वेरूळ येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती म्हणून आश्रमाच्या गुरुवर्य सदगुरू नाथयोगिनी साध्वी श्री अक्का महाराज या होत्या. त्यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.
*वर्षा महाराज म्हस्के यांची कीर्तन सेवा -*
यावेळी प्रसिद्ध भागवत सेविका *ह.भ.प. वर्षा महाराज म्हस्के* यांची सुश्राव्य कीर्तन सेवा झाली. वर्षा महाराजांनी आपल्या ओघवत्या वाणीने कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व, लक्ष्मी पूजन आणि जागृतीचा संदेश उपस्थित भाविकांना दिला. "कोजागिरी म्हणजे कोण जागे आहे हे पाहणारी रात्र, आणि खरी जागृती म्हणजे भक्तीमध्ये जागे राहणे होय," असे निरूपण त्यांनी केले. टाळ-मृदंगाच्या गजरात त्यांनी सादर केलेल्या अभंगांनी भाविक मंत्रमुग्ध झाले.
या सोहळयाप्रसंगी नाथ भक्त, वारकरी संप्रदायातील मान्यवर तसेच वेरूळ येथील ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कार्यक्रमाने संपूर्ण आश्रम परिसर भक्तीमय झाला होता.
कार्यक्रमाच्या शेवटी नाथ आश्रम समितीच्या वतीने कीर्तनकार वर्षा महाराज म्हस्के व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. श्री आकाश भाऊ बनसोड यांचा महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाथ आश्रमातील सर्व सेवेकरी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या