प्रतिनिधी - शारदा ठुले
मावळ तालुक्यात सामाजिक एकोप्याचा आणि साधेपणाचा आदर्श ठरणाऱ्या उपक्रमांतर्गत जनहित चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रविवार, दि. १७ मे रोजी वडगाव मावळ येथे सामुदायिक मंगल परिणय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावर्षी सात जोडपी विवाहबंधनात अडकणार आहेत. या उपक्रमाचे हे आठवे वर्ष असून ट्रस्टचे अध्यक्ष अजय भवार, महासचिव सचिन कांबळे तसेच सोहळा समिती-२०२६ चे अध्यक्ष प्रवीण भवार आणि कार्यक्रम प्रमुख प्रकाश गायकवाड यांनी यंदाच्या सोहळ्याची माहिती दिली आहे. वडगाव येथील भेगडे लॉन्स मंगल कार्यालयात सायंकाळी सात वाजता मुख्य विवाह सोहळा पार पडणार असून त्यापूर्वी दुपारी तीन वाजता तळेगाव दाभाडे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे अभिवादन करून नवरदेवांची भव्य मिरवणूक ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिरापासून भेगडे लॉन्सपर्यंत काढण्यात येणार आहे. सायंकाळी पाच ते सहा या वेळेत मान्यवरांचे स्वागत होणार असून त्यानंतर विवाह विधी संपन्न होतील. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या जोडप्यांना विधी पोशाख, संसारोपयोगी साहित्य, पैंजण-जोडवी तसेच मनगटी घड्याळ देण्यात येणार असून वऱ्हाडी मंडळींसाठी भोजनाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक व सामाजिक समतेच्या विचारांवर प्रेरित होऊन कमी खर्चात, सर्वसमावेशक आणि आदर्श विवाह पद्धती रुजवण्याचा ट्रस्टचा प्रयत्न असून या मंगल सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवदांपत्यांना शुभाशीर्वाद द्यावेत, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या