प्रतिनिधी - शारदा ठुले
गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे, शासनाच्या सूचना नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि आपत्कालीन प्रसंगी प्रशासनाला मदत करणे या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या पोलीस पाटील पदाबाबत मावळ तालुक्यात सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून अनेक गावांतील पोलीस पाटील प्रत्यक्ष गावात राहत नसून तळेगाव, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या शहरांत वास्तव्यास असल्याची चर्चा ग्रामस्थांत रंगली आहे, त्यामुळे स्थानिक पातळीवर तातडीच्या प्रसंगी संपर्क साधण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. काही ठिकाणी पोलीस पाटील यांचे संपूर्ण कुटुंब शहरात स्थायिक झाले असून मुलांचे शिक्षण, कुटुंबीयांची नोकरी आणि वैयक्तिक कारणांमुळे ते बहुतेक वेळ गावाबाहेरच राहतात, परिणामी गावाशी थेट संपर्क कमी झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे, विशेषतः रात्रीच्या वेळी घडणाऱ्या घटना, वादविवाद, अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी जबाबदार व्यक्ती तत्काळ उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांत नाराजी आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या मते, पूर्वी पोलीस पाटील हे गावाच्या सामाजिक आणि प्रशासकीय व्यवस्थेचे केंद्र मानले जात होते आणि गावातील प्रत्येक घडामोडीची माहिती त्यांच्याकडे असायची, मात्र सध्याच्या परिस्थितीत काही ठिकाणी हे पद केवळ औपचारिक राहिल्याची टीका होत आहे, त्यामुळे गावात कायमस्वरूपी राहणाऱ्या आणि लोकांमध्ये मिसळून काम करणाऱ्या व्यक्तींनाच ही जबाबदारी द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दुसरीकडे संबंधित पोलीस पाटील बदलत्या काळानुसार शिक्षण, रोजगार आणि कुटुंबीयांच्या गरजांमुळे शहरात राहणे आवश्यक असल्याचे सांगत असून गावाशी संपर्क तुटलेला नसून प्रशासनाच्या कामात आपण सक्रिय असल्याचा दावा करत आहेत. दरम्यान, अनेक गावांमध्ये प्रत्यक्ष सहभाग कमी झाल्याची चर्चा असतानाच पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाने भरारी पथकाद्वारे वस्तुस्थितीची तपासणी करावी, संबंधित पोलीस पाटील गावात वास्तव्यास आहेत का आणि गावच्या कामकाजात ते कितपत सहभागी आहेत याची पडताळणी करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या