Type Here to Get Search Results !

देहूरोड सामूहिक अत्याचार प्रकरणात चार आरोपींना दुहेरी जन्मठेप; न्यायालयाचा कठोर निर्णय..


 शारदा ठुले 


देहूरोड परिसरात तरुणीवर सामूहिक अत्याचार करून तिचे अश्लील व्हिडिओ तयार करत ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या चार आरोपींना न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर यांनी शुक्रवारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. सन २०२१ मध्ये घडलेल्या या संतापजनक घटनेत आरोपींनी संगनमताने पीडित तरुणीवर वारंवार अत्याचार केले होते. विरोध केल्यास तिला मारहाण केली जात होती तसेच तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन तिला सतत भीतीच्या छायेखाली ठेवण्यात आले होते. अत्याचाराच्या घटनांचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी पीडितेचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. काही आरोपींनी तिच्यावर अनैसर्गिक अत्याचारही केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३७६ (ड), ३७७ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक-पाटील यांनी करून न्यायालयात सक्षम दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्त्यांनी प्रभावी बाजू मांडली. वैद्यकीय अहवाल, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी या प्रकरणात निर्णायक ठरल्या. न्यायालयाने सर्व पुरावे आणि युक्तिवादांचा सखोल विचार करून आरोपी दोषी असल्याचे स्पष्ट करत नोमान ऊर्फ अरबाज जावेद खान, सुलतान ऊर्फ मुश्ताख सलिम सय्यद, रियाज ऊर्फ मन्नन जावेद खान आणि सोहेल शेरअली पिरझादे या चौघांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये सखोल तपास आणि ठोस पुरावे गोळा करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिल्या होत्या. तसेच साक्षीदारांवर कोणताही दबाव येऊ नये आणि ते फितूर होऊ नयेत यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर, पोलीस उपनिरीक्षक डी. एस. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत निंबाळे, महिला पोलीस हवालदार आशा घाटे आणि सचिन पतुरे यांनी तपास प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत आरोपींना शिक्षा होण्यासाठी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या