आधारस्तंभ हरपला… प्रभाग २५ ( जुना प्रभाग ) चा जनतेशी नाळ जुळवणाऱ्या माजी नगरसेविका कु. मीना शामराव ढोले यांचे दुःखद निधन
मुख्य कार्यकारी संपादक अभिजित सिद्धार्थ चव्हाण
पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड शहर दिनांक ०६ में २०२६ आज रोजी पिंपरी-चिंचवड शहरासाठी अत्यंत दुःखद वार्ता समोर आली आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहणाऱ्या, कार्यक्षम आणि जिद्दी नेत्या म्हणून ओळख असलेल्या माजी नगरसेविका कु. मीना शामराव ढोले यांचे आज दिनांक ०६ मे २०२६ रोजी सकाळी ०९.४४ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने प्रभाग क्रमांक २५ (जुना प्रभाग) तसेच किवळे–देहूरोड परिसरावर शोककळा पसरली आहे.
१५ एप्रिल १९६४ रोजी जन्मलेल्या कु. मीना ढोले यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण समाजसेवेसाठी अर्पण केला. सन २००१ मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी जुना प्रभाग २५ मधून विजय मिळवत नगरसेविका म्हणून जबाबदारी स्वीकारली. विकास नगर, किवळे आणि देहूरोड परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांची कार्यपद्धती, लोकांशी असलेला जिव्हाळा आणि निस्वार्थ सेवा यामुळे त्या जनतेच्या मनात कायम घर करून राहिल्या.
भाजपच्या एक निष्ठावंत व कार्यक्षम नेत्या म्हणून त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामांना गती मिळाली. त्या केवळ एक जनप्रतिनिधी नव्हत्या, तर हजारो नागरिकांसाठी आधारस्तंभ होत्या. त्यांच्या अचानक जाण्याने समाजातील एक खंबीर, संवेदनशील आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्व हरपले आहे.
त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार उद्या, दिनांक ०७ मे २०२६ रोजी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी — किवळेगाव स्मशानभूमी किवळे, देहूरोड येथे करण्यात येणार आहेत.
कु. मीना शामराव ढोले यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. त्यांच्या आठवणी, त्यांचे कार्य आणि समाजासाठी दिलेले योगदान हेच त्यांच्या कार्याचा खरा वारसा ठरेल.
भावपूर्ण श्रद्धांजली…

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या