Type Here to Get Search Results !

मावळ बाजार समितीत सत्तेचा स्फोट; शेळकेंचा ‘राजीनामा बॉम्ब’ आणि भाजपचा मास्टरस्ट्रोक..

 प्रतिनिधी - शारदा ठुले 


मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीत अचानक घडलेल्या सत्तांतरामुळे तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. संख्याबळ ठोस असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातातून सत्ता निसटली आणि केवळ पाच संचालकांच्या जोरावर भाजपने सभापतीपद काबीज करत राजकीय पटच फिरवला. या धक्क्यानंतर आमदार सुनील शेळके यांनी तात्काळ आक्रमक भूमिका घेत पक्षांतर्गत शिस्तीचा धाक दाखवला. सभापती निवडणुकीतील अनपेक्षित पराभवानंतर त्यांनी पक्षाच्या सर्व १३ संचालकांना सरसकट राजीनामे देण्याचे आदेश दिले आणि “राजीनामा द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा” असा स्पष्ट इशाराही दिला. मात्र, या आदेशाला संपूर्ण प्रतिसाद न मिळाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात अंतर्गत मतभेद चिघळल्याचे चित्र स्पष्ट झाले. पक्षातील १३ पैकी ९ संचालकांनी आदेश मान्य करत तातडीने आपले राजीनामे सादर केले असून त्यात सुप्रिया मालपोटे, अंजली जांभुळकर, भरत टकले, अमोल मोकाशी, मारुती वाळुंज, दिलीप ढोरे, विक्रम कलवडे, नथुराम वाघमारे आणि विलास मालपोटे यांचा समावेश आहे. दुसरीकडे, संभाजी शिंदे, नामदेव शेलार, विलास मानकर आणि शंकर उर्फ बाळासाहेब वाजे यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट न करता ‘वेट अँड वॉच’ धोरण स्वीकारल्याने राजकीय अनिश्चितता अधिक वाढली आहे. दरम्यान, कमी संख्याबळ असूनही भाजपने सत्तेवर झेंडा रोवला असून सभापती सुभाषराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी असवले, साईनाथ मांडेकर, नामदेव कोंडे आणि बंडू घोजगे हे सदस्य सत्तास्थैर्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. एकूण १८ संचालक असलेल्या समितीत ९ जणांनी राजीनामे दिल्यामुळे सध्याची राजकीय समीकरणे पूर्णपणे ढवळून निघाली असून हे राजीनामे मंजूर झाल्यास कोरम अपुरा ठरून समिती बरखास्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत प्रशासक नेमण्याचा पर्यायही पुढे येऊ शकतो. मात्र या सत्तानाट्यात अजूनही नवे ट्विस्ट संभवत असून राजीनामा दिलेल्या एखाद्या संचालकाने माघार घेतली किंवा उर्वरित चार संचालकांनी शेळकेंच्या बाजूने कल दर्शवला, तर संपूर्ण समीकरण पुन्हा बदलू शकते. त्यामुळे मावळ बाजार समितीतील या घडामोडी केवळ स्थानिक पातळीपुरत्या मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणातही चर्चेचा विषय ठरत असून पुढील काही दिवसांत कोणते नवे राजकीय समीकरण आकार घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे


.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या