मंगळवेढा (सोलापूर):-
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील प्रसिद्ध रीलस्टार आणि 'हॉटेल ग्रामपंचायत'च्या संचालिका 'रोहिणी निलेश पाराध्ये' यांच्या आत्महत्येने संपूर्ण जिल्हा हादरला होता. "ही आत्महत्या की घातपात?" अशी चर्चा रंगत असतानाच, अखेर या आत्महत्येमागचे खरे आणि धक्कादायक कारण समोर आले आहे. पती आणि पत्नीमधील 'किरकोळ घरगुती वादातूनच' रोहिणी यांनी हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आता समोर येत आहे.
● पतीने दिली पोलिसांत कबुली
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवेढा पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून संशयाच्या सर्व बाजू तपासून पाहिल्या आहेत. प्राथमिक तपासादरम्यान आणि चौकशीत पती निलेश पाराध्ये यांनी पोलिसांना सांगितले की, "घटनेच्या दिवशी त्यांच्यात किरकोळ घरगुती कारणावरून वाद झाला होता."
याच कौटुंबिक आणि घरगुती वादाच्या मानसिक तणावातून वैतागून रोहिणी यांनी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ब्रह्मपुरी येथील त्यांच्या स्वतःच्या 'हॉटेल ग्रामपंचायत'च्या स्वयंपाकघरात लोखंडी अँगलला गळफास लावून घेतला.
●अफवांना पूर्णविराम, पोलिसांचा तपास सुरू.
सोशल मीडियावर रोहिणी यांच्या निधनानंतर अनेक तर्कवितर्क आणि संशयास्पद चर्चा सुरू होत्या. मात्र, पती-पत्नीमधील घरगुती वादाचा हा मुद्दा समोर आल्यानंतर आता इतर चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
● पोलीस कारवाई:- मंगळवेढा पोलीस ठाण्यात या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस कौटुंबिक पार्श्वभूमी आणि वादाचे नेमके स्वरूप काय होते, याबाबत अधिक माहिती घेत आहेत.
●चाहत्यांमध्ये हळहळ:- सोशल मीडियावर नेहमी हसतमुख राहून आणि आनंदाने रील बनवून कोट्यवधी लोकांचे मनोरंजन करणाऱ्या रोहिणी यांचा संसार अशा किरकोळ वादापायी उध्वस्त व्हावा आणि त्यांनी इतक्या लहान वयात जगाचा निरोप घ्यावा, याबद्दल त्यांच्या चाहत्यांकडून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या