प्रतिनिधी - शारदा ठुले
लोणावळा परिसरातील यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची सूचना जाहीर करण्यात आली आहे. डोंगरगाव ते कुसगाव या दरम्यान असलेल्या पुलाच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले असून २३ आणि २४ एप्रिल या दोन दिवसांत दुपारी १२ ते ३ या वेळेत संबंधित दिशेची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांच्या माहितीनुसार, एक्सप्रेसवेवरील कि.मी. ५८/५०० येथे असलेल्या पुलाचे शटरिंग काढणे तसेच रंगकाम करणे ही प्रलंबित कामे पूर्ण करणे आवश्यक असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने ही वाहतूक बंदी लागू करण्यात येत आहे. गुरुवार, २३ एप्रिल रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत मुंबईकडे जाणारी सर्व वाहने थांबवली जातील व ती किवळे, देहूरोड आणि तळेगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर वळवून पुढे कुसगाव टोल प्लाझा येथे पुन्हा एक्सप्रेसवेवर सोडली जातील. त्यानंतर शुक्रवार, २४ एप्रिल रोजी याच वेळेत पुण्याकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील व ही वाहने कुसगाव टोल प्लाझा मार्गे राष्ट्रीय महामार्ग ४८ वरून देहू रोड आणि किवळे मार्गे पुण्याकडे वळवण्यात येतील. या कालावधीत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता वाहनचालकांनी प्रवासाचे योग्य नियोजन करावे, शक्य असल्यास या तीन तासांच्या वेळेत एक्सप्रेसवेवरील प्रवास टाळावा किंवा पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच प्रवासादरम्यान कोणतीही अडचण निर्माण झाल्यास मदतीसाठी कंट्रोल रूम (MSRDC) ९८२२४९८२२४ तसेच महामार्ग पोलीस ९८३३४९८३३४ या आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या