Type Here to Get Search Results !

शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या दोन शिवभक्तांचा भीषण अपघातात मृत्यू; मावळात शोककळा..

 शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या दोन शिवभक्तांचा भीषण अपघातात मृत्यू; मावळात शोककळा..



प्रतिनिधी - शारदा ठूले 


शिवज्योत आणण्याच्या पवित्र उद्देशाने निघालेल्या आंदर मावळातील दोन तरुण शिवभक्तांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. नायगाव येथे भरधाव कारच्या जोरदार धडकेत हा अपघात घडला असून ओमकार दत्ता आरडे आणि दर्शन बाळू शिंदे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे आंदर मावळ परिसरात हळहळ व्यक्त होत असून शिंदेवाडी आणि परिसरातील गावांमध्ये शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंदर मावळातील शिंदेवाडी-घाटेवाडी येथील ओमकार दत्ता आरडे व दर्शन बाळू शिंदे हे दोघे शिवभक्त विसापूर किल्ल्यावरून शिवज्योत आणण्यासाठी भक्तिभावाने निघाले होते. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सुमारे दीडच्या सुमारास ते नायगाव परिसरातून जात असताना समोरून येणाऱ्या एमएच १४ जेए ५१११ क्रमांकाच्या कारने अचानक डिव्हायडर ओलांडत विरुद्ध दिशेने येत त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. काही क्षणांपूर्वी शिवज्योत आणण्याच्या उत्साहाने प्रवास सुरू केलेले हे दोन तरुण क्षणार्धात काळाच्या पडद्याआड गेल्याने परिसरात तीव्र दुःख व्यक्त होत आहे. धर्मकार्याच्या पवित्र हेतूने घराबाहेर पडलेल्या या तरुणांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश खांडभौर यांनी या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले असून शिवज्योत आणण्यासाठी निघालेल्या तरुणांचा अशा अपघातात मृत्यू होणे अत्यंत वेदनादायी व धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ओमकार आरडे आणि दर्शन शिंदे हे दोघेही शिवभक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन या कार्यासाठी निघाले होते. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण मावळ तालुका शोकाकुल झाला असून ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि दुःखी कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या