पगार काढून देतो 5 हजार द्या, वैद्यकीय अधिकाऱ्याला मागितली लाच, असा अडकला ACB च्या जाळ्यात
पाच हजारांची लाच मागणारा वरिष्ठ सहायक लाचेची 4000 रुपये रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
जालना : भ्रष्टाचाराची नवनवी प्रकरणे दररोज समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. जालन्यात एका आरोग्य अधिकाऱ्याला सात दिवसांचा थकलेला पगार काढून देण्यासाठी पाच हजारांची लाच मागणारा वरिष्ठ सहायक लाचेची 4000 रुपये रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे.जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांत लाच मागणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाया वाढल्या आहेत. सजग झालेले नागरिक एसीबीकडे तक्रार करत असून यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांवर चांगलाच वचक निर्माण झाला आहे. तरीदेखील जिल्ह्यातील भ्रष्टाचार कमी होत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबी जालना यांच्याकडे लेखी तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यावर जिल्हा परिषद कार्यालयातील वरिष्ठ सहायकाच्या दालनात ठरलेली रक्कम देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी गेले असता लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपीस ताब्यात घेतले. अंगझडतीत लाचेची 4000 रकमेसह सातशे रुपये रोख आणि रेडमी कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी विरोधात कदीम जालना पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या