मनमाड - रामेश्वरम एक्सप्रेसमध्ये प्रवाशांची फसवणूक; पॅसेंजरचे तिकीट असताना एक्सप्रेसमध्ये चढल्याने टीसीकडून ११०० रुपयांची अवाजवी वसूली
महाराष्ट्र लोक न्यूज चॅनेल
मनमाड:प्रतिनिधी
मनमाड रेल्वे स्थानकावरून मनमाड ते रामेश्वरम एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या बिहार राज्यातील दोन प्रवाशांना रेल्वे टीसीच्या (टिकीट चेकर) अवाजवी दंडाचा मनस्ताप सहन करावा लागला आहे. चुकून पॅसेंजर ऐवजी एक्सप्रेस गाडीत बसलेल्या या प्रवाशांकडून नियमानुसार १२० रुपये भाडे किंवा दंडाची रक्कम आकारणे अपेक्षित असताना, टीसीने तब्बल ११०० रुपये वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहार येथील दोन व्यक्ती मनमाड स्थानकातून प्रवास करण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी मनमाड ते पुढील प्रवासासाठी पॅसेंजर गाडीचे तिकीट काढले होते. मात्र, गाड्यांच्या गडबडीत आणि अज्ञानापोटी ते चुकून मनमाड - रामेश्वरम एक्सप्रेसच्या जनरल (सर्वसामान्य) डब्यात जाऊन बसले.
गाडी सुरू झाल्यानंतर जनरल डब्यात तपासणीसाठी आलेल्या टीसीने या दोन्ही प्रवाशांकडे तिकिटांची मागणी केली. प्रवाशांनी पॅसेंजर गाडीचे तिकीट दाखवताच, "तुम्ही एक्सप्रेसमध्ये बेकायदेशीर प्रवास करत आहात" असे सांगून टीसीने त्यांच्याकडे दंडाची मागणी केली. प्रवाशांनी आपली चूक लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला, परंतु टीसीने १२० रुपयांच्या नियमानुसार होणाऱ्या दंडाऐवजी थेट ११०० रुपये वसूल केले.
अवाजवी दंड आणि बेकायदेशीर वसूलीचा संशय
रेल्वेच्या नियमांनुसार, पॅसेंजर तिकीट असताना एक्सप्रेसच्या जनरल डब्यात प्रवास केल्यास दोन्ही गाड्यांमधील तिकिटाचा फरक आणि ठराविक दंड आकारला जातो. मात्र, संबंधित टीसीने सर्वसामान्य आणि परप्रांतीय प्रवाशांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांच्याकडून अवाजवी रक्कम वसूल केल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे.
या प्रकारामुळे टीसीने पावती देऊन ही रक्कम वसूल केली की पावती न देता बेकायदेशीरपणे खिशात घातली, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. अशा प्रकारे रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांची आर्थिक अडवणूक आणि लूट होत असल्याने वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून संबंधित टीसीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.





टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या