Type Here to Get Search Results !

राजूर MSEB चा भीषण खेळखंडोबा! दर पाच मिनिटाला वीज गुल; महागामोलाची मिरची जळण्याची भीती, खामखेडा सर्कलमध्ये संताप लोडशेडिंग नसतानाही विजेचा लपंडाव सुरूच; जनावरांच्या पाण्यासाठी शेतकरी हैराण; राजूर फिडरच्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी.

 राजूर MSEB चा भीषण खेळखंडोबा! दर पाच मिनिटाला वीज गुल; महागामोलाची मिरची जळण्याची भीती, खामखेडा सर्कलमध्ये संताप



लोडशेडिंग नसतानाही विजेचा लपंडाव सुरूच; जनावरांच्या पाण्यासाठी शेतकरी हैराण; राजूर फिडरच्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी.



प्रतिनिधी


भोकरदन तालुक्यातील राजूर येथील महावितरण (MSEB) उपकेंद्राचा कमालीचा भोंगळ आणि बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कोणत्याही प्रकारचे अधिकृत लोडशेडिंग जाहीर नसतानाही, राजूर उपकेंद्रातून दर पाच-पाच मिनिटाला वीज पुरवठा खंडित केला जात आहे. या विजेच्या धक्केशाहीमुळे खामखेडा सर्कल मधील डझनभर गावांना आणि विशेषतः मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. महावितरणच्या या भोंगळ कारभारामुळे ग्रामीण भागात तीव्र असंतोष निर्माण झाला असून, राजूर फिडरच्या स्थानिक मुजोर कर्मचाऱ्यांना ताळ्यावर आणावे, अशी आग्रही मागणी आता नागरिक करत आहेत.

 महागडे मिरची पीक धोक्यात; शेतकऱ्यांचे डोळे भरले!

सध्या परिसरातील शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे कर्ज काढून आणि उन्हात कष्ट करून शेतामध्ये मिरची पिकाची लागवड केली आहे. या कोवळ्या रोपांना दररोज वेळेवर पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, महावितरणच्या विजेच्या सततच्या लपंडावामुळे शेतातील विहिरी आणि कूपनलिकांच्या (बोअरवेल) मोटारी सुरू करताच लाईट जात आहे. दिवसातून सलग १-२ तास देखील वीज मिळत नसल्याने पाण्याचे नियोजन कोलमडले असून, कडक उन्हात ही मिरचीची महागडी रोपे जळून खाक होण्याच्या मार्गावर आहेत.


 मुक्या जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर!



विजेचा हा लपंडाव दररोज पाच ते दहा मिनिटांतून एकदा अव्याहतपणे सुरू असतो. परिणामी, गावातील नळ योजना आणि शेतावरील पाण्याच्या टाक्या भरता येत नाहीत. ऐन उन्हाळ्यात मुक्या जनावरांना पिण्याचे पाणी काढण्यासाठी वीज नसल्याने शेतकऱ्यांना विहिरींवरून हंड्याने पाणी उपसावे लागत आहे. दररोज २ ते ३ तास सलग वीज देण्याची साधी तसदीही महावितरणचे कर्मचारी घेत नसल्याचे चित्र आहे.

 'या' गावांना बसतोय विजेचा तीव्र फटका:

राजूर उपकेंद्राच्या ढिसाळ कारभारामुळे खामखेडा सर्कल मधील खालील गावांचा वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे:

राजूर

खामखेडा

पळसखेडा (पिंपळे)

गाडेगव्हाण

पिंपळगाव बारव

थोटे पिंपळगाव

थिगळखेडा

 "स्थानिक कर्मचाऱ्यांना ताळ्यावर आणा, अन्यथा..." - गावकऱ्यांचा इशारा

परिसरातील नागरिकांचा आणि शेतकऱ्यांचा असा आरोप आहे की, वीज यंत्रणेत कोणताही तांत्रिक बिघाड नसतो. केवळ राजूर फिडरवरील स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मनमानी आणि आळशी कारभारामुळे हा विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. पाच-पाच मिनिटाला वीज जात असल्यामुळे घरगुती विद्युत उपकरणे (टीव्ही, फ्रीज) देखील जळून खाक होत आहेत. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून राजूर फिडरच्या स्थानिक कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी खामखेडा सर्कल मधील गावकऱ्यांनी केली आहे. अन्यथा महावितरण उपकेंद्रावर कुलूप ठोकून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. -सचिन पाटील फटाले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या